जळगाव (प्रतिनिधी) चित्तोडगडच्या निम्बाहेडा पोलिस ठाण्यात गांजा तस्करी प्रकरणी दाखल गुन्ह्यात वनकोठ्याचा जयसिंग ऊर्फ रामसिंग बेलदार हा संशयित असून त्याचा शोध घेण्यासाठी राजस्थान पोलिस धडकले. परंतु, जयसिंग मिळून न आल्यामुळे पथक परतले आहे. तर दुसरीकडर मुंबई एनसीबीच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा गांजा पकडल्यानंतर तपासाची पाळेमुळे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वनकोठे या छोट्याशा गावात येऊन पोहोचली आहेत.
यासंदर्भात अधिक असे की, ऑगस्ट २०२१ मध्ये राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्याच्या निम्बाहेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजाची तस्करी होत असल्याची माहिती तेथील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तीन जणांना अटक केली. यातील गणेश चौधरी व अनिल सोनवणे (दोघांची पूर्ण नावे माहीत नाही) हे दोघे जळगावातील रहिवासी आहेत तर शंकरदास बैरागी हा भिलवाडा येथे राहतो. या तिघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीचा २६ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्यात तिघांना अटक केल्यानंतर त्यांचे गांजा तस्करीचे मोठे रॅकेट असून आणखी काही लोक सहभागी असल्याचा संशय आहे. त्यानुसार अटकेतील गणेश चौधरी याचे कॉल डिटेल तपासले असता त्यात घटनेच्या दिवशी त्याचे जयसिंग सोबत सर्वाधिकवेळा बोलणे झाल्याचे समोर आले.
तसेच जयसिंग हा देखील आपला साथीदार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार उपनिरीक्षक गोपालनाथ यांच्यासह दोन कर्मचारी शुक्रवारी वनकोठ्यात आले. त्यांनी कासोदा पोलिस ठाण्यात नोंद करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने वनकोठ्यात जाऊन जयसिंगच्या घरी तपासणी केली. परंतु, जयसिंग मिळून आला नाही. त्यामुळे शनिवारी हे पथक परत गेले. गणेश चौधरी, अनिल चौधरी व शंकरदास बैरागी हे तिघे राजस्थानात न्यायालयीन कोठडीत बंदी आहेत.
दरम्यान, नांदेड गांजाच्या प्रकरणात एनसीबीच्या पथकाने नंदलाल ऊर्फ नंदू रतन बेलदार याची चौकशी केली होती. तर राजस्थान पोलिस शोधत असलेला जयसिंग हा नंदूचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.