नंदुरबार (वृत्तसंस्था) दारू पिताना पत्नीबाबत अश्लील शब्द वापरल्याच्या रागातून एकाने आपल्या मित्राचा निर्घुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, नवापूर तालुक्यातील कामोद येथील दिलीप बापजी गावित हा ११ जुलै रोजी परिसरात आंबे विक्री करण्यासाठी गेला होता. परंतु रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचला नाही. त्या अनुषंगाने त्याच्या भावाने विसरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १६ जुलै रोजी कामोद गावाचे पोलीस पाटील यांनी वन पट्ट्यातील शेत शिवारात एक अनोळखी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती विसरवाडी पोलिसांना दिली होती. मृतदेहाचा मृतदेह शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ११ जुलै रोजी मयत व्यक्ती व त्याचा मित्र रवींद्र धीरजी गावीत हे रात्री दारू पीत बसले होते. मयत दिलीप गावित यांनी मित्र रवींद्र गावित याच्या पत्नीबाबद अश्लील शब्द वापरल्याने रवींद्र याला राग आला. त्याने दिलीप गावित यांचे डोके भिंतीवर आदळून मारहाण करून त्याला जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्यासाठी जंगलात शव फेकून दिले होते. याबाबत आरोपी रवींद्र गावित यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने, जमादार दिलीप गावित, पोलीस कॉन्स्टेबल दारासिंग पावरा हे करत आहे.