नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर आज काही मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला आहे. भाजपचे नेते नारायण राणे यांनी लघू व मध्यम उद्योग मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी राणे यांनी पहिल्याच दिवशी आपल्या दणका दाखवत अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. यामुळे दिल्लीतील सरकारी बाबूंमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
आक्रमक स्वभाळामुळे कायम चर्चेत असलेल्या नारायण राणेंनी आज मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. जबाबदारी स्वीकारल्यानंतर राणे कामाला लागले. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. मात्र अधिकारी बैठकीला तयारी करून आले नव्हते. त्यामुळे राणेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. त्यामुळे अधिकाऱ्यांची दैना झाली. मंत्रालयात किती अधिकारी अनुपस्थित आहेत याची माहिती राणेंनी मागवली. ‘मी मंत्रालयात पदभार स्वीकारायला येणार असल्याची कल्पना असतानाही तयारी का केली नाही?’ असा सवाल करत राणेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. जवळपास १ तास चाललेल्या बैठकीत राणेंनी अर्धा तास अधिकाऱ्यांची शाळा घेतली. त्यामुळे अधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.
दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना उत्तर दिले. कोणतेही खातं हे छोट किंवा मोठ नसते. मी जेव्हा खात्याचा कार्यभार पाहीन आणि मी जेव्हा या खात्याला न्याय देईन, तेव्हा संजय राऊतांना कळेल की हे खातं किती महत्त्वाचे आहे, असा टोला त्यांनी लगाविला.
शरद पवारांकडून अभिनंदन
मला केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर शरद पवार यांनी मला फोन केला. आणि चांगले काम करा, असा सल्ला पवारांनी दिला, असेही राणेंनी सांगितले. त्याचबरोबर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मन एवढे मोठे नाही. मला मंत्रिपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवत निशाणा साधला.