जळगाव (प्रतिनिधी) महात्मा गांधीजींच्या १५३ व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. महात्मा गांधीजींनी जवळजवळ सर्वच विषयांवर चिंतन केले, आपला प्रभाव टाकला आहे. त्यातील अभिनय हा तर त्यांच्या बालपणापासूनच आवडीचा विषय होता. विद्यार्थ्यांमध्ये अभिनय कला रुजविणे व महात्मा गांधीजींच्या विचारांच्या जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी १५ सप्टेंबर पर्यंत निःशुल्क नोंदणी व २० सप्टेंबर पर्यंत आपले व्हिडीओ पाठविणे आवश्यक आहे. विजेते व पारितोषिक वितरण २ ऑक्टोबरला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, असे स्पर्धेचे आयोजक गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे कळविले आहे.
दोन गटासाठी भरघोस रोख पारितोषिके
५ ते १० वी इयत्तेतील आणि ११ वी ते खुला गट अशा दोन गटातील स्पर्धेसाठी आयोजकांनी भरघोस अशी रोख पारितोषिके ठेवलेली आहेत. पहिल्या ५ ते १० गटासाठी प्रथम – (15,000), द्वितीय – (11,000), तृतीय – (7,000), आणि दोन उत्तेजनार्थ (प्रत्येकी 5, 000) रुपये असे पारितोषिके आहेत. दुसऱ्या गटासाठी विजयी पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे 21,000 (प्रथम), 15,000 (द्वितीय), 10,000 (तृतीय) आणि प्रत्येकी 5 हजार रुपयांचे दोन उत्तेजनार्थ रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देखी देणार आहे.
एकपात्री नाट्य प्रयोगाच्या व्हिडीओ बाबत
प्रस्तुत दोन गटाकरीता घेतल्या जाणाऱ्या एकपत्री अभिनय स्पर्धेसाठी गांधीजींचे जीवन, व्यक्तीमत्व, विचार, तत्त्व, कार्य, प्रेरक प्रसंग तसेच गांधीजींच्या विचारांना केंद्रस्थानी ठेऊन एकपात्री नाट्य बनवू शकतात. वरील विषयावर इंग्रजी, हिंदी किंवा मराठी पैकी कोणत्याही एका भाषेत स्वतंत्र स्क्रिप्ट लेखन असावे. आक्षेपार्ह, राजकीय, जातीयता, सामाजिक तेढ निर्माण करणारी स्क्रिप्ट नसावी. लिखीत स्क्रिप्टनुसार एकपात्री नाट्याचे व्हीडीओ (चित्रण एमपी फोर) फॉरमॅटमध्ये करणे आवश्यक आहे. हे चित्रण कॅमेरा वा मोबाईल आडवा ठेऊन करावयाचे आहे. व्हिडीओची फाईल साईज ७०० एमबी पर्यंत असावी. आधी अन्य कारणासाठी रेकॉर्ड केलेले, आधीच सोशल मीडियावर शेअर झालेले व्हीडीओ नसावे. स्पर्धेसाठीच खास बनविलेला व्हीडीओ पाठविलेला असावा. एकपात्री नाट्य प्रयोग कमीत कमी २ मिनिटे तर जास्तीतजास्त ५ मिनिटांचा असावा. अभिनय सादर करत असताना निसर्ग, मानव यांचा नाश होईल असे दृश्य नसावे किंवा उपयोगात येणाऱ्या चीज वस्तू आक्षेपार्ह नसाव्या. या नाट्य सादरीकरणात वेशभूषा, रंगभूषा, संगीत इत्यादीचा प्रयोग करू शकतात परंतु तसे ते बंधनकारक नाही. संगीत, स्क्रिप्ट संवाद याबाबत कॉपीराईटची जबाबदारी स्पर्धकाची असेल. स्पर्धेसाठी स्वतंत्र निवड समिती नेमलेली आहे. निवड समितीला ६० टक्के गुण देण्याचे अधिकार असून उर्वरित ४० टक्के मूल्यांकन यूट्युब, फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या लाईक्स् यावर विजेत्यांची निवड होईल. त्यात अंतिम निर्णय गांधी रिसर्च फाउंडेशनचा असणार आहे. स्पर्धेसाठी निःशुल्क नोंदणी १५ सप्टेंबर पर्यंत, २० सप्टेंबर पर्यंत अभिनय व्हिडीओ पाठविणे, २३ सप्टेंबरला व्हिडीओ सोशल मीडियात अपलोड होतील. अपलोड व्हिडीओला ३० सप्टेंबर पर्यंत लाईक्स प्राप्त होतील व विजेत्या स्पर्धकांची २ ऑक्टोबरला घोषणा व त्याच कार्यक्रमात पारितोषिक वितरण होईल.
व्हिडीओ सादर करण्यासाठी लिंक
स्पर्धेसाठी नोंदणी व व्हिडीओ सादर करण्यासाठी http://www.gandhifoundation.net/GRF_EVT2021/login.php लिंक दिलेली आहे. स्पर्धकांना स्पर्धेच्या काळादरम्यान आयडी क्रमांक व पासवर्ड दिला जाईल. स्पर्धकाने त्याचा वैध इमेल आयडी व मोबाईल क्रमांक पुरवावा. आपला अभिनय सादर करताना स्पर्धकाने ‘गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय अभिनय प्रतियोगीता नाव, गाव, तालुका, जिल्हा राज्य, विद्यालय, गट, एकपात्री शीर्षक इत्यादी माहिती देणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी भारतभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेसाठी १५ सप्टेंबर पर्यंत निःशुल्क नोंदणी करून स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे.