धरणगाव(प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारत रत्न इंदिरा गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करून विद्यार्थ्यांची एकता रॅली काढण्यात आली.
यानिमित्त झालेल्या अभिवादन कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. बालभारती अभ्यास मंडळाचे माजी सदस्य ज्येष्ठ शिक्षक श्री. बापू शिरसाठ यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांनी सामाजिक सौहार्दता जपण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी मोलाचं योगदान दिले आहे असे सांगून त्यांच्या जीवन चरित्राचा मागोवा घेतला. मुख्याध्यापक डॉ. सोनवणे यांनी राष्ट्रीय एकता दिनाचे महत्त्व विशद करून एकात्मकतेतून सामाजिक समता जपण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. यू.एस.बोरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.जी.यू.सोनवणे यांनी केले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.













