चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि मानसशास्त्र विभाग तसेच मानसमित्र समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ताण तणाव व्यवस्थापन’ या विषयावर आधारित ‘एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे’ आयोजन दि.२८ मार्च रोजी करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उदघाटन डॉ.जी. बी. चौधरी (अध्यक्ष, मानसशास्त्र अभ्यास मंडळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांच्या हस्ते कै.मा. ना.अक्कासो सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य) व संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार कै. सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सुरेल स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक डॉ.जी. बी. चौधरी (अध्यक्ष, मानसशास्त्र अभ्यास मंडळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील (अध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा), बीजभाषक प्रा.डॉ.सी.पी.लभाने (मानसशास्त्र विभाग प्रमुख, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव), प्रमुख मार्गदर्शक डॉ. एस. यु. अहिरे (सहा. प्रा.मानसशास्त्र विभाग, जी. टी. पी. महाविद्यालय, नंदुरबार) व डॉ. एस. वाय. जाधव (मानसशास्त्र विभाग प्रमुख, एस. एस. व्ही. पी. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, धुळे) त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, कार्यशाळेचे समन्वयक तसेच मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर. आर. पाटील, एस. जी. देवरे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी वृक्ष संवर्धनाच्या उद्देशाने उपस्थित मान्यवरांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना कार्यशाळेचे समन्वयक व मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.आर.पाटील म्हणाले की, ‘कोरोनाच्या काळात व आजच्या धावपळीच्या युगात अनेकांना ताणतणावाला सामोरे जावे लागते. बाहेरील नैसर्गिक, मानवनिर्मित घटकांचा माणसांच्या मनावर तसेच कर्मचाऱ्यांच्या मनावर, जीवनावर परिणाम होतो, त्याचे व्यवस्थापन व्हावे तसेच नोकरीत निर्माण होणाऱ्या ताणतणावाचे व्यवस्थापन करून भविष्यातील अडचणी टाळता याव्यात या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत देशभरातील २०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘कोरोनाच्या काळात अनेकांच्या मनावर ताण निर्माण झाला. तंत्रज्ञानाचा वापर या काळात वाढला. त्याचे फायदे व तोटे देखील जाणवले. या सर्वांतून तणावमुक्त होण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे’.
उदघाटनपर मनोगत व्यक्त करताना डॉ.जी. बी. चौधरी म्हणाले की, ‘ताणतणाव जेव्हा अतिउच्च पातळीवर जातो तेव्हा त्याचे व्यवस्थापन कसे करावे? हे जाणून घेतले नाही तर जीवनात अनेक संकटे निर्माण होतात. ताणामुळे माणसे एकमेकांपासून दुरावतात. सुसंवादाने प्रश्न सोडविले तर ताण दूर करण्यास मदत होते. कौतुक करणे व संवाद साधणे ही तणावमुक्त होण्याची साधने आहेत’.
याप्रसंगी प्रा. डॉ. सी. पी. लभाने कार्यशाळेचे बीजभाषण करतांना म्हणाले की, ‘कार्यात अडथळा आल्यावर मेंदूची विचार प्रक्रिया विस्कळीत होते व त्यातून ताण निर्माण होतो. नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त शारीरिक व मानसिक कार्य केल्याने ताण निर्माण होतो. सभोवतालचे वातावरण, व्यक्तिगत कारणे, खोटे बोलणे, चुकीची कृती करणे यातून तणाव निर्माण होतो. म्हणून परिस्थिती पाहून वर्तन केल्यास तणावमुक्त होता येते. शारीरिक व्याधी, अयोग्य आहार, चिंता, सतत काम करण्याची वृत्ती, घटस्फोट, तुरुंगवास, दुखणे, चिडचिड, प्रचंड राग, उदास, अर्थहीनता, आत्मविश्वास कमी होणे ही ताणतणावाची लक्षणे आहेत. हा ताण करण्यासाठी विपरित वागू नका, आत्मविश्वास जागृत ठेवा, आत्मटिका करू नका, अपयश सहजतेने घ्या, कामाचा अतिरेक टाळा, प्रोत्साहन देण्याऱ्या समूहात राहा, विनोदी राहा व नियमित व्यायाम करा’.
यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘व्यक्तिपरत्वे ताणतणाव वाढत असतो. अतिताणामुळे आत्महत्या, मृत्यू यांचे प्रमाण वाढले आहे ही चिंताजनक बाब आहे. कामात प्रामाणिकपणा ठेवणे, सकारात्मक विचार करणे यातून तणाव कमी करता येईल. तणावमुक्त जीवन जगल्यास जीवन सुधारता येईल’. या उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन सौ.एस.बी.पाटील यांनी केले तर आभार एस.बी. देवरे यांनी मानले.
या कार्यशाळेच्या पहिल्या सत्राप्रसंगी डॉ.एस.यु.अहिरे ‘ताण तणाव व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘विचार करण्याच्या प्रक्रियेतून ताण निर्माण होतो.उत्तम आरोग्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती व चांगली मानसिकता असावी लागते. संगीत, कला, गायन, लेखन व व्यायाम यातून तणाव दूर करता येऊ शकतो.ताणतणाव दूर करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या, चांगला विचार मनात आणा. नेहमी हसत राहा. त्यातून तणावमुक्त जीवन जगता येईल.शरीरावर व मनावर अपेक्षांचे ओझे असेल तर ताण निर्माण होतो. मानसिकता बिघडण्यातून आरोग्यावर परिणाम होतो. चांगला ताण सकारात्मकता, उत्साह, ध्येयपूर्तीसाठी ऊर्जा देत असतो. अयोग्य ताणामुळे शरीराची व मनाची कार्यक्षमता कमी होते. त्याची कारणे शोधून उपाययोजना केल्यास जीवन सुरळीत जगता येते.
या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ.सचिन वाय. जाधव मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, डॉ. एस. वाय. जाधव, डॉ. व्ही. पी. पाटील, डॉ. आर.आर.पाटील व रजिस्ट्रार डी. एम. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. सचिन वाय. जाधव ‘How to Deal with Stress in Daily Life? या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘ताणतणाव निर्माण होण्यासाठी आनुवंशिकता, जैवरसायने, मेंदूच्या कार्यपद्धतीमध्ये दोष, भावनिक बुद्धीचा अभाव, कौटुंबिक वातावरण, सततचा ताण, चिंता अशी करणे असू शकतात. या ताणामुळे वजन कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, आत्मविश्वास कमी होतो व सतत चिंताग्रस्त राहणे असे परिणाम होतात. म्हणून ताणतणाव व्यवस्थापनासाठी स्वतःला ओळखा, सकारात्मक राहा, स्वतःतील क्षमता ओळखा, नवीन छंद जोपासा, मनातील विचार मुक्तपणे व्यक्त करा, यामुळे ताण कमी करण्यास मदत होईल. यावेळी त्यांनी फुग्याच्या प्रत्यक्षिकासह तुलना व स्पर्धेतून ताण कसा निर्माण होतो हे दाखवून दिले.
यावेळी डॉ. व्ही. पी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, ‘कोणतीही व्याधी निर्माण करण्यात मन कारणीभूत असते. म्हणून सकारात्मक विचारामुळे व्याधी व ताणापासून दूर राहता येते. या कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. एस. कोल्हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. व्ही. पी.,पाटील, डॉ. एस. वाय. जाधव, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. आर.आर.पाटील तसेच रजिस्ट्रार डी.एम.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रा. श्वेता जैन यांनी आपले प्रातिनिधिक मत व्यक्त केले.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य एन. एस. कोल्हे म्हणाले की, ‘दैनंदिन कामातून वेळ काढून ताणतणावावर मात करावी. ताणाचा व जीवनातील सुखाचा जवळचा संबंध आहे. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास ताण कमी होतो. या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. बी. पाटील यांनी केले तर आभार एस. बी. देवरे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीत विभागातील विद्यार्थी, सर्व समिती सदस्य तसेच मानसमित्र मंडळाचे सदस्य यांनी परिश्रम घेतले तसेच ईशीता कन्स्ट्रक्शन, चोपडा, रेयॉन प्रोटेक्शन प्रा. लि. जळगाव तसेच सारस केमिकल्स एजन्सी, अमळनेर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून बहुसंख्य शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.