धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव रेल्वे स्थानकावर पोहोचताच नवजीवन एक्सप्रेस एक्सप्रेस रोखून धरल्यामुळे रेल्वे प्रशासनाची आज सकाळी चांगलीच तारांबळ उडाली होती.
आरक्षित तिकीट काढूनही चेन्नईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या नवजीवन एक्सप्रेसमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे प्रवाशांना टॉयलेटलाही जाता येत नव्हते. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास साधारण २० मिनिटं धरणगाव रेल्वे स्थानकात नवजीवन एक्सप्रेस रोखून धरल्यामुळे रेल्वे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. परंतू स्टेशन मास्टर निशिकांत ठाकूर यांनी आरपीएफच्या मदतीने प्रवाशांची समजूत काढल्यानंतर एक्सप्रेस पुन्हा मार्गस्थ झाली.
कर्नाटक मधून 50 ते 60 प्रवाशांचा एक ग्रुप हा नवजीवन एक्सप्रेस मधून प्रवास करत होता. रेल्वे आरक्षित तिकीट असतानाही गाडीत बसायलाही जागा नव्हती. अगदी प्रवाशांना टॉयलेटलाही जाता येत नव्हते. त्यामुळे धरणगाव रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचल्यावर प्रवासी खाली उतरले व त्यांनी आक्रमक पवित्रा घेत रेल्वे रुळावर बसले व नवजीवन एक्सप्रेस ही गाडी रोखून धरली. स्टेशन मास्टर निशिकांत ठाकूर यांनी आरपीएफच्या मदतीने प्रवाशांची समजूत काढली. अमळनेर रेल्वे स्थानकात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर एक्सप्रेस पुन्हा मार्गस्थ झाली. परंतू या दरम्यान, एक्सप्रेस २३ मिनिटे लेट झाली होती.