मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची अंमलबजावणी संचालनालय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सत्याची भूमिका मांडणाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. जे जाहीरपणाने बोलतात त्यांच्याविरोधात यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले.
मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस म्हटलं जातं
सद्या यंत्रणांचा गैरवापर केला जातो त्याचं हे उदाहरण आहे. नवाब मलिक जाहीरपणे बोलातात त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे अधिक भाष्य करायची गरज नसल्याचे पवार यांनी सांगितले. पुरावे कशाचे? कसली केस काढली त्यांनी? एक साधी गोष्ट आहे, काही झालं आणि विशेषत: मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं. कोण काय, कुठं काय माहिती नाही. देशात हे सुरु आहे. हे काही नवीन नाही. मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी माझ्यावरही असाच आरोप होता. त्यावेळीही असं वातावरण तयार केलं होतं. २५ वर्ष झाली. केंद्र सरकार किंवा एजन्सीबद्दल जे बोलतात त्यांना यंत्रणांचा गैरवापर करुन त्रास दिला जातोय, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला. संजय राऊत काय म्हणाले त्याची मला कल्पना नाही, मी त्याच्यावर भाष्य करण्याचं कारण नाही असेही पवार म्हणाले.
ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी सुरू
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले असल्याचे वृत्त आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक आज सकाळी पाच वाजताच नवाब मलिक यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर जवळपास दोन तास चर्चा सुरू होती. त्यानंतर सकाळी सात वाजता नवाब मलिक यांनी स्वत: हून ईडी कार्यालयात चौकशीसाठी येत असल्याचे सांगितले आणि त्यानंतर ते ईडी अधिकाऱ्यांसोबत कार्यालयात दाखल झाले आहेत. तब्बल गेल्या ३ तासांपासून नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे.