जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांनी याबाबत स्वत: ट्वीट करुन माहिती दिलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे, ट्विटवरून याबाबत त्यांनी माहिती दिली आहे, खडसे म्हणाले की, माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. काळजीचे कारण नाही, गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.
एकनाथराव खडसेंच्या स्नुषा व रावेर मतदार संघाच्या भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांचा कोरोना चाचणी अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आला. दुसरीकडे काही तास उलटत नाही तोच एकनाथराव खडसेंचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा तीन दिवसा पूर्वी संपला. आणि आज त्यांचा देखील कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खडसेंना सौम्य लक्षणे असून ते घरीच विलगीकरणात उपचार घेत आहे.
एकनाथराव खडसे यांना सर्वात आधी १९ नोव्हेंबर रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची Covid चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल”, असं एकनाथराव खडसे ट्विटरवर म्हणाले होते. त्यानंतर उपचार घेऊन ते बरे झाले होते. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी पुन्हा त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने डॉक्टरांनी त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला दिला होता. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. यावेळी त्यांनी प्रसिद्धीपत्रकही जारी केलं होतं. विशेष म्हणजे या कालावधीत त्यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र, कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांनी ईडीकडून तारीख वाढवण्याची मागणी केली होती. ती मागणी ईडीने मान्यही केली होती.