पाटणा (वृत्तसंस्था) तब्बल १८ तासांनी बिहार विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर झाला आहे. अत्यंत चुरशीच्या या लढाईत ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे सलग चौथ्यांना मुख्यमंत्रीपदावर विजारमान होण्यासाठी नितीश कुमार यांना संधी मिळणार आहे.
भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती आले आहेत. १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपने, ४३ जागा जेडीयू आणि मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. महागठबंधनमधील काँग्रेसला १९ जागांवर तर डाव्यांना १६ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये एमआयएमला पाच जागा तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीएला बहुमत मिळाल्याने नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) पदरात हवा तसा विजय मिळाला नाही. जेडीयू पक्ष सुरुवातीपासून ४० ते ५० जागांवर आघाडीवर दिसत होता. पण ५० च्या पुढे जाऊ शकला नाही. विशेष म्हणजे दुपारी जेडीयूच्या एका नेत्याने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपलं अपयश स्वीकारही केला आहे.