जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सुप्रीम कॉलनीवासियांनी आजवर सहन केलेली पिण्याच्या पाण्याची ससेहेलपाट लवकरच बंद होणार असून पुढील महिन्यात दि. १५ फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीचा मुहूर्त साधत नागरिकांना थेट अमृत योजनेच्या नळ संयोजनद्वारे पाणी मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कॉलनीवासीयांना सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी महापौर सौ. भारती सोनवणे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक वर्षभरापासून पाठपुरावा करीत असून सोमवारी महापौरांनी कामाची पाहणी केली.
सुप्रीम कॉलनीतील नागरिकांना आजवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. सुप्रीम कॉलनीतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी परिसरात अमृत योजनेंतर्गत पाण्याची टाकी आणि यंत्रणा उभारण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी वर्षभरात वारंवार आढावा घेत कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. १ जानेवारीला केलेल्या पाहणीत बांधकाम पूर्ण करण्याची २५ जानेवारी ग्वाही दिली असल्याने सोमवारी महापौरांनी पाहणी केली. यावेळी महापौरांसोबत पाणी पुरवठा सभापती अमित काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे, बाबा साळुंखे, योगेश बोरोले यांच्यासह मनपा अधिकारी आणि मक्तेदार प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्य जोडणी लवकरच होणार
अमृत योजनेच्या भूमीगत टाकीत पाणी येण्यासाठी आवश्यक असलेली मुख्य पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. महामार्गाजवळून जात असलेल्या वाघूरच्या पाईपलाईनला सुप्रीम कॉलनीची पाईपलाईन जोडणे बाकी असून लवकरच ते काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मनपा अभियंत्यांनी दिली.
पंप बसविण्याच्या कामाला उद्या सुरुवात
जलकुंभावर विद्युत पंप बसविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व बांधकाम आणि प्लास्टर पूर्ण झाले असून उद्यापासून पंप बसविण्यास सुरुवात होणार आहे. पंप बसविल्यानंतर विद्युत पुरवठा जोडणी करून त्याची चाचणी घेण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी महापौरांना दिली. तसेच जोडणीचे सर्व काम १५ दिवसात पूर्ण करून देण्याचे आश्वासन देखील मक्तेदाराने दिले आहे.
अमृत योजनेच्या पाण्याचा श्रीगणेशा
सुप्रीम कॉलनीत आजवर असलेल्या नळ संयोजनातून कधीही सुरळीत आणि नियमित पाणीपुरवठा झालेला नाही. अमृत योजनेंतर्गत नागरिकांना नळ संयोजनची जोडणी देण्यात येत असून सर्व काम पूर्ण झाल्यानंतर जुनी यंत्रणा बंद करून अमृतच्या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. अमृतच्या पाण्याचा श्रीगणेशा जळगाव शहरात प्रथमच सुप्रीम कॉलनीत होणार आहे. सर्व काम पूर्ण करून १५ फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीचा मुहूर्त साधून श्रीगणेशा होऊ शकतो अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी महापौर सौ.भारती सोनवणे यांना दिली आहे.
वर्षभर पाठपुरावा केल्याचे सार्थक होणार
शिवकॉलनीवासियांची पाण्याची रात्री-बेरात्री होणारी फरफट थांबविण्यासाठी केलेला पाठपुरावा सफल झाला. सुप्रीम कॉलनीतील नागरिकांचा पाण्याचा त्रास दूर होण्यासाठी गेल्या वर्षभरापासून आम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक प्रशासनाच्या मागे लागून पाठपुरावा करीत होतो. वर्षभर केलेल्या पाठपुराव्यामुळे कामाला गती मिळाली असून लवकरच यंत्रणा कार्यान्वित होऊन नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. सर्वांच्या पाठपुराव्याचे सार्थक होणार असल्याने समाधान असल्याचे महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सांगितले.