नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नवी दिल्लीचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी लसीकरणाबाबत मोठं वक्तव्य केलंय. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेत आणि भविष्यात अजून व्हेरिएंट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत व्हॅक्सीनच्या बुस्टर डोसची गरज असल्याचं मत गुलेरिया यांनी व्यक्त केलंय.
डॉ. रणदीप गुलेरिया पुढे बोलताना ते म्हणाले की, “असं वाटतंय की, आपल्याला कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज भासणार आहे. कारण वेळेनुसार आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. तसेच भविष्यात विकसित होणाऱ्या कोरोनाच्या नवनव्या व्हेरियंट्सपासून आपलं रक्षण व्हावं म्हणून आपल्याला बूस्टर डोसची गरज आहे.”
एम्सच्या प्रमुखांनी म्हटलं की, सेकेंड जनरेशनची लस इम्युनिटीसाठी उत्तम ठरेल. कारण नवनव्या व्हेरियंटवर ही लस प्रभावी ठरेल. ते म्हणाले की, वॅक्सीनच्या बूस्टर डोसचं ट्रायल सुरु झालं आहे. देशातील लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस देऊन झाल्यानंतर सर्वांना बूस्टर डोस देण्याच्या मोहीमेला सुरुवात करावी लागेल.
भारतात लहान मुलांच्या लसीकरणाला सप्टेंबरपासून सुरुवात होऊ शकते. एआयआयएमएसचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, “कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम महत्त्वाचं पाऊल ठरु शकते.