नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बॅंकेचा (पीएनबी) निवृत्त उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी याच्या विरोधात सीबीआयने नवे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये शेट्टी आणि त्याची पत्नी आशालता शेट्टी या दाम्पत्याने 2 कोटी 63 लाख रुपयांची बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी कर्जाच्या रूपाने पीएनबीला तब्बल 13 हजार कोटी रुपयांचा गंडा घातला. त्यांच्याशी संगनमत केल्याच्या आरोपावरून शेट्टी आधीपासूनच सीबीआयच्या रडारवर आहे. आता शेट्टी दाम्पत्याविरोधात 6 वर्षांच्या कालावधीत 4 कोटी 28 लाख रुपयांची संपत्ती जमा केल्याप्रकरणी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. शेट्टी दाम्पत्याने उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा 2 कोटी 63 लाख रुपयांची अतिरिक्त संपत्ती जमवली. ती संपत्ती त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा जवळपास अडीच पट अधिक आहे. शेट्टीची पत्नी इंडियन बॅंकेत क्लार्क आहे. शेट्टी दाम्पत्याने मुंबईत चार फ्लॅट खरेदी केले आहेत. त्यांच्या नावे बॅंकांमध्ये 75 लाख रुपयांच्या ठेवी आणि बॅलन्स आहे. शेट्टीला मोदी-चोक्सीप्रकरणी मार्च 2018 मध्ये अटक करण्यात आली. तो सध्या तुरुंगात आहे.