मुंबई (वृत्तसंस्था) वेगवान विकास कामे करण्यात आग्रेसर असलेले आणि मोदी सरकारमधील केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी एक इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात चांगलेच भडकले. केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावेळी नितीन गडकरी चांगलेच संतापले. इमारतीच्या उभारणीला झालेल्या विलंबाबद्दल गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांना कार्यक्रमतच झापले.
उद्घाटनानंतर बोलताना गडकरी म्हणाले,”अशा कार्यक्रमात प्रथा असते की, कोणतंही काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांचं अभिनंदन केलं जातं. पण मला संकोच वाटतोय की, तुमचं अभिनंदन कसं करू? कारण २००८मध्ये निश्चित झालं होत की, अशा पद्धतीची इमारत उभारण्यात येईल. २०११ मध्ये याची निविदा निघाली आणि हे दोनशे अडीचशे कोटींचं काम नऊ वर्षांनंतर आज पूर्ण झालं आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी लागलेल्या वेळेत तीन सरकारं आणि आठ अध्यक्ष राहिले. त्यानंतर आज ह काम पूर्ण झालं आहे. सध्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्षांचा याच्याशी काही संबंध नाहीये. पण ज्या महान लोकांनी २०११ पासून २०२० पर्यंत हे काम केलंय, त्यांचे फोटो या कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा,” असा टोला गडकरींनी अधिकाऱ्यांना लगावला.
















