पाटणा (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावावर पुन्हा एकदा एक नवा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे. तो म्हणजे सातव्यांदा मुख्यमंत्री पदावार विराजमान होण्याचा. संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांना पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळणार आहे.
संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांना औपचारिकपणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधीमंडळ नेते म्हणून निवडण्यात आले. यानंतर नितीश कुमारांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावाही केला. ते सोमवारी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या निमित्ताने नितीश कुमार यांचा ७ दिवसात खुर्ची सोडावे लागण्याची वेळ ते सातव्यांदा मुख्यमंत्री होण्याचा प्रवास थक्क करणारा आहे. सोमवारी नितीश कुमार बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. आज पाटण्यात झालेल्या एनडीएच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजप नेते सुशील कुमार मोदी शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पाटण्यात झालेल्या एनडीएच्या बैठकीत जोडीयू, भाजप, हम आणि व्हीआयपी पक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते मंडळी उपस्थित होते. याशिवाय भाजपा नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली. तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसर उद्या सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शपथविधी कार्यक्रम राजभवनात संपन्न होणार आहे.
बिहारच्या बख्तियारपूर जिल्ह्यात जन्मलेल्या नितीश कुमार यांचं सुरुवातीचं शिक्षण याच जिल्ह्यातील श्री गणेश हायस्कूलमध्ये झालं. नंतर त्यांनी पाटणाच्या इंजिनिअरींग कॉलेजमधून मॅकेनिकल इंजीनियरींगचं शिक्षण पूर्ण केलं. याच काळात ते जयप्रकाश नारायण यांच्या विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. 70 च्या दशकात देशात मोठी राजकीय उलथापालथ झाली. देशभरात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात आंदोलन उभं राहिलं. त्याचं नेतृत्व बिहारने केलं.