मुंबई (वृत्तसंस्था) धनुष्यबाण हा सेनेपासून कोणी वेगळा करु शकणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय आपण हे हवेत बोलत नसून कायदेतज्ञांशी बोलणे झाल्यानंतर ह्या विधानावर आलो असल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेच्या चिन्हाबद्द्ल सध्या चर्चा सुरू आहे. धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मतदान पत्रिकेवर चिन्हं महत्त्वाचं आहे, पण हे धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची चिन्हं लोकं बघतात, माणूस बघून मतदान करतात. ज्यांना या साध्या माणसांच्या मेहनतीने मोठेपण मिळालं, मोठी झाली ती माणसं गेली… ज्यांनी यांना मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं आज ही शिवसेनेसोबत आहेत..” असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरू आहे. कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असा इशारा ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला आहे. सगळे आमदार गेले, तरी पक्ष अस्तित्वात असतो. तुम्ही भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. जे 15-16 आमदार माझ्याबरोबर राहिलेत त्यांचं जाहीर कौतुक करायचंय. अशी जिगरीची माणसं असतात, तिथे विजय होतोच. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. येत्या 12 तारखेला सुनावणीचा निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल. पण या केसमुळे देशात लोकशाहीचं भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे. आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का हे सांगणारा हा निकाल असेल. देशाच्या लोकशाहीची वाटचालीची दिशा दाखवणारा निकाल ठरेल.’ असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठाणे, नवी मुंबईतील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, निष्ठावान शिवसैनिकांना बाजूला ठेवून बंडखोरांच्या शिफारशींवर काहींना नगरसेवक म्हणून उभे केले होते. तेच लोक आता सोडून गेले आहेत. मात्र, सामान्य शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू आहेत. रोज मातोश्रीवर येऊन हे सामान्य लोक रडत आहेत. शिवसेनेने आतापर्यंत कोणाचीही पार्श्वभूमी न पाहता सामान्यांना मोठे केले. आता सामान्यांच्या मेहनतीतून मोठी झालेली लोकच शिवसेना सोडून जात आहे. मात्र ही सामान्य लोक शिवसेनेत असेपर्यंत आपल्याला कशाचीही चिंतात करण्याची गरज नाही. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका केली आहे. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्यायालयाच्या या निकालावर देशाच्या लोकशाहीचे भवितव्य अवलंबून आहे. न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.