भुसावळ (प्रतिनिधी) राजीनामा देऊन पक्षाला वेठीस धरणे चुकीचे आहे. पक्ष कुणासाठी थांबत नसतो. पक्षापेक्षा कुणी मोठा नसतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नाव न घेता अभिषेक पाटील यांचे चांगलेच कान टोचले आहेत.
जि.प. सदस्य रवींद्र पाटील यांच्या निधीतून विकासकामांच्या उदघाटनाप्रसंगी ऑनलाईन संबोधन करतांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिल्हा राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहावर भाष्य केले आहे. आज भुसावळात कंडारी – साकेगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्रनाना पाटील यांच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांच्या उदघाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथून ऑनलाईन या कार्यक्रमाला संबोधीत केले. उपमुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा एका परिवारासारखा आहे. यामुळे कुणाला पदे मिळाली नाहीत म्हणून नाराज होण्याची गरज नाही. राजीनामा देऊन पक्षाला वेठीस धरणे चुकीचे आहे. पक्ष कुणासाठी थांबत नसतो. पक्षापेक्षा कुणी मोठा नसतो. आज अजित पवार मुख्यमंत्री असले तरी ते पक्षामुळे उपमुख्यमंत्री असल्याची जाणीव सर्वांनी ठेवण्याची गरज आहे. ज्यांना कुणाला पदे मिळतात, त्यांनी त्या पदाची जबाबदारी देखील लक्षात घेतली पाहिजे. पक्ष कुणासाठी थांबत नाही. लोक येतात, जातात पक्ष पुढे जात असतो. दुसरी मंडळी त्यांची जबाबदारी घेत असते, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामानाट्यांवर भाष्य केले.
काही दिवसांपूर्वी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आल्याने त्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांचे समर्थक असणाऱ्या पक्षाच्या १२ फ्रंटलच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी देखील तातडीने आपल्या पदांचे राजीनामे दिलेत. खुद्द अभिषेक पाटील यांनी आपल्या समर्थकांना आवाहन करून राजीनाम्याद्वारे पक्षाला वेठीस न धरण्याचे आवाहन केले होते. परंतू हे त्यांचेच दबावतंत्र असल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी होती. तशात आज थेट अजितदादा पवार यांनी नाव न घेता अभिषेक पाटील यांचे चांगलेच कान टोचले आहेत.