मुंबई (वृत्तसंस्था) शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीनंतर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. पवारांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची बातमी समोर आल्यानंतर आता यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. शरद पवार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचा त्यांनी म्हंटल आहे.
‘महाराष्ट्रात चर्चेसाठी अनेक विषय आहेत. मराठा आरक्षण, लसीकरण, कोरोना यासारखे अनेक विषय आहेत. लसीकरणासंदर्भातच मुख्यमंत्री व पवार यांच्याच बहुतेक चर्चा झाली. या विषयांवर चर्चा होऊ शकत नाही का?, असा सवाल करतच राऊतांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसंच, हे सरकार पाच वर्ष टिकणार असून शरद पवारांचा सरकारचा पूर्ण आशीर्वाद आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
शरद पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय झालं?
मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेली खडाजंगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर मंत्र्यांनी घेतलेला आक्षेप, त्याचसोबत मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री आवाज चढवून बोलत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. त्याचसोबत सरकार टिकवणं ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादीची जबाबदारी आहे असं उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना सांगितले. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत झालेली खडाजंगी आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरील आक्षेप याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.