नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोविड महामारीविरुद्धच्या लढाईत वाढत्या चाचण्या ही एक आपली मोठी शक्ती आहे. सेवा परमो धर्म: च्या मंत्रानं डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी नि:स्वार्थपणे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सेवा देत आहेत. या सर्व प्रयत्नांत निष्काळजीपणाची ही वेळ नाही. कोरोना निघून गेला आहे किंवा कोरोनामुळे आता कोणताही धोका नाही असे समजण्याची ही वेळ नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला.
मोदी पुढे म्हणाले की, आज आपल्या देशात कोरोना रुग्णांनासाठी ९० लाखांपेक्षा जास्त बेड्स उपलब्ध आहेत. १२ हजार क्वारंटाइन सेंटर्स आहेत. देशातल्या चाचण्यांची संख्या १० कोटींचा टप्पा ओलांडेल. करोनाविरोधात लढताना जास्तीत जास्त चाचण्या करणं ही आपली ताकद आहे. आपण काही फोटो पाहतो आहेत त्यातून असं दिसतंय की लोक निष्काळजीपणा करत आहेत, मास्क लावत नाहीत. करोनाबाबत जे काही नियम घालून दिले आहेत ते पाळत नाहीत. एक लक्षात ठेवा तुम्ही केलेली एक चूक ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी धोकादायक ठरु शकते. सगळे आनंद साजरे करा, जबाबदारी म्हणून घराबाहेर पडा पण करोना रोखण्यासाठी जे नियम पाळणं आवश्यक आहेत ते पाळले गेलेच पाहिजेत. कारण अद्याप करोना व्हायरससोबतची लढाई संपलेली नाही. जनता कर्फ्यूचा दिवस ते आजपर्यंत आपण ज्या नेटाने आणि धीराने लढा दिला तसाच लढा आपल्याला यापुढेही द्यायचा आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. आपल्या देशातील तज्ज्ञ करोना लशीसाठी खूप मेहनत घेत आहेत. करोनाची लस जेव्हाही येईल तेव्हा प्रत्येक भारतीयापर्यंत ती लवकरात लवकर कशी पोहचेल, याची तयारी सरकारकडून केली जातेय. आज अमेरिका असेल किंवा युरोपातील इतर देश…या देशांत करोना संक्रमणाचे रुग्ण कमी होत होते, परंतु हे आकडे पुन्हा एकदा वेगानं वाढू लागलेत’ असं म्हणतानाच भारताची परिस्थिती इतर देशांपेक्षा सुधारलेली दिसत असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलंय. ‘आज देशाचा रिकव्हरी रेट चांगला आहे. मृत्यू दर कमी आहे. जगातील साधन-संपन्न देशांच्या तुलनेत भारत आपल्या जास्तीत जास्त नागरिकांचं जीवन वाचवण्यात यशस्वी ठरलाय. कोविड संक्रमणाविरुद्ध लढाईत चाचण्यांची वाढती संख्या ही आपली मोठी ताकद राहिलीय’ असं म्हणत पंतप्रधानांनी करोनाविरुद्धच्या लढाईत विजयाची आशा व्यक्त केलीय.