मुंबई (वृत्तसंस्था) गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या विजयाचे शिल्पकार असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं मुंबईत आज जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे. आता खरी लढाई तर मुंबईत (Mumbai) होणार आहे, असं फडणवीस म्हणाले.
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर गोवा निवडणुकीसाठीचे प्रभारी असलेले महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आज मुंबईत पक्षाच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलं. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं विधान केलं आहे. आता खरी लढाई मुंबईत असणार आहे. आम्ही मैदानात उतरलो आहोत आणि उद्यापासूनच तयारी लागा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
“चार राज्यांमध्ये मतदारांनी मोदीजींवर विश्वास दाखवला आणि घवघवीत यश भाजपाला मिळालं आहे. पण याचा सगळ्यांनाच आनंद झालेला दिसत नाही. काहींना इतकी मळमळ झाली तरी मी पुन्हा एकदा सांगतो मोदीजीच निवडून येणार आहेत. आमचे कार्यकर्ते यूपी, गोव्यात प्रचाराला गेले होते. गोव्यातील विजयात महाराष्ट्राचाही वाटा आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो. उत्तर प्रदेशात बुलडोझर बाबानं कमाल केली. मोदींच्या मागे जनतेचा आशीर्वाद आहे. लढाई संपली नाही. कुठल्याच लढाईनं होरपळून जायचं नाही. खरी लढाई मुंबईत होणार आहे. आम्हाला मुंबईला कोणत्या एका पक्षाकडून नव्हे, तर भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं आहे. यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. आजचा विजयाचं सेलिब्रेशन झाल्यानंतर उद्यापासून कामाला लागा. मुंबईचा प्रचंड विजय आणि राज्यात भाजपाचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज राहावं”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं आहे.