जळगाव (प्रतिनिधी) येथील गणेश कॉलनीतील सेवानिवृत्त वृद्धाने ऑनलाईन मागविलेली साडी खराब निघाल्याने ती परत करतांना वृद्धाची ७४ हजार ९९९ रुपयात फसवणूक झाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, गणेश कॉलनी येथे अनंत नारायण कुलकर्णी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. कुलकर्णी यांनी ३१ ऑगस्ट रोजी आयबीआयएसबी यां कंपनीतून ऑनलाईन पद्धतीने साडी मागविली होती. साडी मिळाली मात्र, ती खराब निघाल्याने कुणकर्णी यांनी गुगलवरुन कंपनीचा ८९६९९२३२७० हा क्रमांक मिळविला. त्यावर संपर्क साधला असता, संबधितांनी एनी डेक्स ऍप डाऊनलोड करायला सांगितले. यादरम्यान कुलकर्णी यांना त्यांचा मोबाईल नंबरही दिला. ऍप डाऊनलोड करताच कुलकर्णी यांच्या बँकखात्यातून पहिल्या वेळी २५ हजार दुसऱ्या वेळी ४९ हजार ९९९ असे एकूण ७४ हजार ९९९ रुपये कपात झाल्याचे कुलकर्णी यांना मेसेज आले. ८९६९९२३२७० या क्रमांकावरील व्यक्तीने आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर कुळकर्णी यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक तुषार जावरे करीत आहेत.