जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिव कॉलनी भागात एका ६३ वर्षीय व्यक्तीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना (दि.६) रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्माकर सुकलाल सूर्यवंशी (वय ६३, परिजात अपार्टमेंट शिव कॉलनी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पद्माकर आपला मुलगा व सून यांच्या सोबत राहत असून मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना पंख्याला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
ही घटना घडली तेव्हा त्यावेळी सून ही माहेरी गेली होती तर मुलगा सुहास सूर्यवंशी हा रेल्वेत नोकरीवर असल्याने कामावर गेला होता. सायंकाळी ५.३० वाजता मुलगा सुहास ड्यूटीवरुन घरी आला. त्यावेळेस वडील पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच शेजारच्यांना मृतदेह खाली उतरून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कुरकुरे यांनी मयत घोषित केले. रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण अद्यापही कळू शकले नाही. पुढील तपास पोहेका ज्ञानेश्वर सोनवणे, रमेश अहिरे करीत आहे.