छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) समोरचे बघतच राहतील, असा मेळावा दसऱ्याच्या दिवशी नारायण गडावर दुपारी १२ वाजता होणार आहे. या मेळाव्यात मी समाजबांधवांशी संवाद साधणार आहे. सर्व समाजबांधवांनी गडावर येऊन आपली एकजूट दाखवावी, असे आवाहन मराठायोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
जरांगे-पाटील म्हणाले की, आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा निवडणुकीनंतर पश्चात्ताप होईल. दसऱ्याच्या दिवशी नारायण गडावर मी कुठलेही राजकीय भाष्य करणार नाही. आमच्या मागण्या मान्य कराव्यात, एवढेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझे सांगणे आहे. अभ्यासकांशी चर्चा करण्याचे नाटक सरकारने बंद करावे. १३ महिन्यांनंतर सरकारला आता अभ्यासक आठवले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठा समाज आपल्या मागण्यांवर ठाम असून, तसूभरही मागे हटणार नाही. नारायण गडावर मराठा समाजाची एकी दिसून येईल. तुफान संख्येने मराठा पोरं मेळाव्याला येतील. गडावर दर्शन झाल्यावर दुपारपर्यंत गडावरच थांबा, गडावरून उतरू नका. मेळाव्यातून मराठा समाजाची एकजूट दाखवा, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी समाजबांधवांना केले.
अमित शाहांवर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखविण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे-पाटलांच्या शाहांशी संबंधित विधानावर दिली. त्यावर शाह हे काय सूर्य आहेत का?, ते केवळ केंद्रीय गृहमंत्री आहेत. मराठ्यांचे आंदोलन सरकारने गोडीगुलाबीने हाताळावे, सरकारने मराठ्यांचा रोष पत्कारू नये, नाहीतर आम्हालाही नाईलाजाने ‘ आरे ला कारे’ करावे लागेल, असे जरांगे-पाटील म्हणाले. शिंदे समितीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अहवालाला राज्य सरकारने सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. मात्र, या अहवालात नेमके काय आहे, याचाही सरकारने खुलासा करावा. त्यानंतरच आम्हाला समजेल, समाजाची फसवणूक झाली की नाही. आमच्या मागण्या अहवालात असणे अपेक्षित आहे, नाहीतर समिती काही कामाची नाही, अशी टीकाही जरांगे- पाटील यांनी केली.