भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील खेडगाव येथील वृद्ध दाम्पत्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर टोकाचा निर्णय घेतल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.
वृद्ध दाम्पत्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. रामगीर ओंकार गोसावी (वय ९०) आणि मंडाबाई रामगीर गोसावी (८०, रा खेडगाव ता. भडगाव), असे आत्महत्या केलेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. गोसावी दाम्पत्य रात्री झोपी गेल्यानंतर सकाळी उशिरापर्यंत झोपेतून न उठल्याने मुलगा त्यांना उठवायला गेला. त्यावेळी त्याला घरात त्याचा आई-वडिलांचा मृतदेह आढळून आला.
रामगीर गोसावी यांना दम्याचा त्रास होता. गेल्या अनेक वर्षापासून ते खेडगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीत संचालक म्हणून बिनविरोध निवडून येत होते. त्यांच्या पश्चात निवृत्त पोलिस असलेला मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात नोंद करण्यात आली. दरम्यान, सर्व काही व्यवस्थित असताना गोसावी दाम्पत्याने घेतलेल्या निर्णयाचा सर्वांना धक्का बसला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.