मुंबई (वृत्तसंस्था) सध्या संपूर्ण जगावर करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने दहशतीचं वातावरण निर्माण केलं असताना दक्षिण आफ्रिकेतून गेल्या १९ दिवसांत एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगात भीतीचं वातावरण आहे. दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम नवा व्हेरिएंट आढळून आला. त्यामुळे आफ्रिकेचा समावेश ऍट रिस्क देशांच्या यादीत करण्यात आला आहे. विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांना १४ दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं जात आहे. मात्र गेल्या २० दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून भारतात दाखल झालेल्यांची संख्या मोठी आहे. या आकडेवारीनं प्रशासनाची चिंता वाढली आहे. १० नोव्हेंबरपासून १ हजार प्रवासी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत दाखल झाल्याची आकडेवारी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितली. या आकडेवारीमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेतून दाखल झालेल्या हजार प्रवाशांपैकी किती जण मुंबईत आहेत, किती जण शहराबाहेर गेले, ते कोणाच्या संपर्कात आले, याचा शोध आता घेतला जाणार आहे. त्यासंदर्भातील माहिती गोळा करण्याचं काम सुरू झाले आहे.