धरणगाव (प्रतिनिधी) पत्ता विचारतांना झालेल्या गैरसमजातून काही नागरिकांनी एकाला मुल पळविणारा समजून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. परंतू संपूर्ण चौकशीअंती पोलिसांनी संबंधित व्यक्तीस सोडून दिले आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ, असे आवाहन धरणगाव पोलिसांनी केले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आज सकाळी बालाजी मंदिर परिसरात धुळे येथील एक व्यक्ती पत्ता विचारण्यास थांबला. तो व्यक्ती थोडा बोबडा बोलत असल्यामुळे त्याची भाषा कळाली नाही. त्या व्यक्तीने डफले वाले विचारले असता एका महिलेला डब्बेवाले ऐकू आले. त्याचवेळी तिथं एक लहान मुलगा उभा होता. संबंधित महिलेने तुमच्याकडे आले आहेत, घरी घेऊन जा, असे सांगितले. थोडं पुढे जात नाही, तोपर्यंत त्या मुलाची आई समोरून आली आणि त्यांचा मुलाला पळवून घेऊन जात असल्याचा संशय निर्माण झाला. काही नागरिकांनी लागलीच त्या व्यक्तीला पडकून पोलीस स्थानकात जमा केले. पोलिसांनी चौकशी केली असता, तो व्यक्ती धुळे येथील असल्याचे कळाले. तसेच त्याचे जे धरणगाव तालुक्यातील नातेवाईक होते, त्याच्याकडून देखील माहिती घेतली. यानंतर त्याला सोडून देण्यात आले.
अफवांवर विश्वास ठेउ नका : पो.नि. खताळ !
मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीचे सोशल मीडियावर अफवांचे पीक आले आहे. अनेकांकडून ग्रु्रपवरील मेसेज खात्री न करता फॉरवर्ड केले जात आहेत. त्यामुळे अफवा वाढीस लागल्या आहेत. नागरिकांनी अफवेचा कोणताही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू नये. त्याशिवाय मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांसह पालकांनीही योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी केले आहे. तसेच, संशयास्पद व्यक्तींसदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांसोबत संपर्क साधावा. शालेय प्रशासनानेही या पाश्र्वभूमीवर खबरदारी घ्यावी. मुलांना शाळे सोडतांना घरी नेण्यासाठी पालकांनी देखील काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.