मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचेच नेते व कार्यकर्ते फोडत असल्याने आता भाजपशी जुळवून घ्यावे, असं मत सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान यामुळे शिवसेनेत गटबाजी असल्याची चर्चा सुरु असल्याच्या प्रश्नावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. “आमच्या पक्षात कोणतेही गट नाहीत. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट आहे, असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, “प्रत्येकजण आपापल्या पक्षाचा विस्तार करत असतो. आम्हीदेखील करत असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसही करेल. कोणी कशा पद्धतीने लढायचं यावर कोणतीही चर्चा झालेली नसून ती योग्य वेळी होईल. सरकार पाच वर्ष चालवायचं यासाठी तिन्ही पक्षांची बांधिलकी आहे. सरकार चालवताना मी आधीही अनेकदा सांगितलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि दिल्लीतील नेतेही नेहमी किमान समान कार्यक्रम सरकार चालवण्याचा मुख्य आधार असल्याचं सांगत असतात.”
शिवसेनेत दोन गट आहेत का असं विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, “आमच्या पक्षात कोणतेही गट नाहीत. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट आहे. उद्धव ठाकरे प्रमुख आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही”.
मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही सर्व जण आहोत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांसोबत मजबुतीने उभे आहोत. सत्ता गेल्याने ज्यांच्या पोटात दुखत आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्ष चालणार. कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी यश मिळणार नाही. महाविकास आघाडीमध्ये असणारा समन्वय देशाच्या राजकारणात आदर्श आहे. आघाडीचं सरकार कसं चालवावं त्याचा उत्तम फॉर्म्यूला महाराष्ट्रात आहे,” असं सांगत संजय राऊत यांनी यावेळी भाजपावर निशाणा साधला.
“प्रताप सरनाईक हे आमदार आणि शिवसेनेच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. ते आणि त्यांचं कुटुंब त्रासात असून त्यांच्या मागे ज्याप्रकारे केंद्रीय यंत्रणांना लावण्यात आलं आहे ते पाहता असं संकट कोणावरही येता कामा नये. पण या संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब, शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. गरज लागेल ती मदत केली जाईल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
“विनाकारण दिलेला त्रास काय असतो हे पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या लोकांनी तसंच महाराष्ट्रातही अनुभवला जात आहे. सत्ता गेली, जात आहे किंवा मिळत नाही म्हणून विनाकारण त्रास देत भारताच्या संस्कृतीला शोभत नाही आणि महाराष्ट्राला तर अजिबात नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.