चाळीसगाव (प्रतिनिधी) अंमली पदार्थ असलेल्या अफूची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले असून त्यात नऊ गोण्यांमध्ये सुमारे १८ लाख रुपये किमतीची अफुची बोंडे व चुरा मिळून आला. पोलिसांना पाहताच वाहनचालक तेथून पसार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी वाहनासह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वाहतूक अंमली पदार्थ रोखण्यासह त्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथक नियुक्त केले आहे. या पथकातील उप निरीक्षक सुहास आव्हाड हे रविवारी (दि.८) पहाटे गस्तीवर असताना शहरातील कोतकर कॉलेजजवळ सकाळी पावणेसहाच्या सुमारास पांढऱ्या रंगाची हुंडाई कार (क्रमांक- एम. पी. ०९ डब्ल्यूसी १४८५ ) येताना दिसली. पोलिसांचा तिच्यावर संशय बळावल्याने त्यांनी कार चालकास थांबण्याचा इशारा दिला. मात्र, तो भरधाव वेगाने कार चालवून निघून गेला.
गस्तीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ एकमेकांना संपर्क करून शहरातील मुख्य रस्त्यावर येऊन कार अडवण्याचा प्रयत्न केला. अखेर वाहनचालकाला पळून जाण्यासाठी रस्ता न मिळाल्याने त्याने रेल्वे स्टेशन जवळील मालधक्काजवळ वाहन थांबवत वाहन सोडून पळून गेला. या कारची तपासणी केली असता, त्यात अफूची बोंडे व त्याचा चुरा असलेल्या नऊ गोण्या मिळून आल्या. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी लगेचच मुद्देमाल तपासला असता, १ विंटल ८० किलो २४० ग्रॅम वजनाचा सुमारे १८ लाख २ हजार ४०० रुपयांचा अफू असल्याचा पंचनामा केला.
या मालासह दहा लाखांची हुंडाई कंपनीची क्रेटा कार असा एकूण २८ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर ढिकले, उप निरीक्षक सुहास आव्हाड, योगेश माळी, चालक नितीन वाल्हे, राहुल सोनवणे, विनोद भोई, सुभाष घोडेस्वार, पंढरीनाथ पवार, महेंद्र पाटील, भूषण पाटील, तुकाराम चव्हाण, दीपक पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, विजय पाटील, पवन पाटील, आशुतोष सोनवणे, समाधान पाटील, रवींद्र बच्छे, राकेश महाजन, ज्ञानेश्वर गीते, विनोद खैरनार, नीलेश पाटील, शरद पाटील, प्रवीण जाधव संदीप पाटील यांनी केली. तपास उप निरीक्षक सुहास आव्हाड यांच्यासह कमचारी विनोद भोई व उज्ज्वल कुमार म्हस्के हे करीत आहेत.