मुंबई (वृत्तसंस्था) मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजारपणामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जात नव्हते. त्यावरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा राज्यातील विरोधी पक्ष हा नामर्द आहे, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
आजारपण हे कधी कोणावर येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आजारपणाच्या काळात झालेली टीका ही माणुसकी आणि नीतीमत्तेला धरुन नव्हती. विरोधक नामर्दपणे मुख्यमंत्र्यांवर टीका करत राहिले. मात्र, राज्यातील जनतेने त्यांना प्रत्युत्तर दिले. आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर मुख्यमंत्री शिवतीर्थावरील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमालाही उपस्थित होते. त्यामुळे राज्यातील जनता उत्साहात आहे. मात्र, ज्या कोणी मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावरुन टीकाटिप्णी केली आहे, त्यांच्या अंतरंगात किती घाण आहे, हे दिसून आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावरुन रान उठवणाऱ्या विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधी पक्षात सध्या एकप्रकारची नामर्दानगी आली आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं मोठ्या मनाचं राजकारण होतं असे, त्याचा विरोधी पक्षाकडून ऱ्हास केला जात आहे. विरोधक अत्यंत कोत्या मनाचं राजकारण करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे नेते नामर्दानगी हा शब्द वापरत आहेत. त्यामुळे मीदेखील त्यांच्यासाठी हाच शब्द वापरत आहे. त्या नामर्दानगीला आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने उत्तर मिळाले, असे राऊत यांनी म्हटले.