इंदापूर (वृत्तसंस्था) राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने एक वर्षे यशस्वी पणे शासन चालवले असून, विरोधक उगाच मोकळी भांडी वाजवून आवाज करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस बरोबर शिवसेना म्हणजे दुधात साखर आहे, असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
इंदापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस- मित्र पक्षांचा कार्यकर्ता व पदाधिकारी बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे, संजय सोनावणे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष गणेश झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी राष्ट्रवादी अध्यक्ष महारूद्र पाटील, युवक तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर, नितीन शिंदे उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या की, सत्ता गेल्याने विरोधकांना स्वप्न पडत आहेत, की हे सरकार तीन महिने, सहा महिने टिकणार म्हणून, मात्र महाविकास आघाडी सरकारने एक वर्षाचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. येत्या दहा वर्षांत तरी कोणी काहीही करू शकणार नाही. विरोधकांना रिकामा वेळ असल्याने त्यांची रिकाम्या भांड्याचा आवाज व्हावा तसेच त्यांचा आवाज चालला आहे. सूत्रसंचालन शुभम निंबाळकर यांनी केले तर बाळासाहेब ढवळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमंत कोकाटे व कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी प्रयत्न केले.