नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इंशा अल्लाह, एक दिवस एक हिजाबी पंतप्रधान होईल, असं एमआयएमचे नेते असद्दुदीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी म्हटलं आहे. ओवैसी यांनी ट्विट करून हिजाब (Hijab) वादावर ही प्रतिक्रिया दिली आहे.
मुली आई-वडिलांना म्हणतील मला हिजाब परिधान करायचं आहे. आई-वडीलही मुलींना परवानगी देतील आणि म्हणतील, तू बिनधास्त हिजाब परिधान कर. बघू तुला कोण अडवतो. हिजाब परिधान करूनच मुली डॉक्टरही होतील. कलेक्टरही होतील. बिझनेस वुमनही होतील. एसडीएणही होतील. इंशा अल्लाह, एक दिवस हिजाबी पंतप्रधानही होईल. कदाचित त्यावेळी हे बघायला मी जिवंत नसेल. पण हिजाबी एक दिवस पंतप्रधान जरुर होईल, असं ओवैसी म्हणाले.
यापूर्वीही ओवैसी यांनी हिजाबचं समर्थन केलं होतं. हिजाब परिधान करा किंवा अंगावर चादर घ्या हा तुमचा अधिकार आहे. संविधानाने दिलेला अधिकार आहे. पुट्टास्वामी यांचं जजमेंट आहे. त्यातही अधिकार देण्यात आला आहे. हीच आमची ओळख आहे. हिजाब घालण्यास विरोध करणाऱ्यांना खडसावल्याबद्दल मी त्या मुलीचं अभिनंदन करतो. तुम्ही घाबरू नका. कोणतीही मुस्लिम महिला कोणत्याही भीतीशिवाय हिजाब परिधान करू शकतात, असं ओवैसी यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, हिजाबचा वाद केवळ कर्नाटकपर्यंत मर्यादित राहिला नाही. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटत आहेत. राज्यातील अनेक भागात निदर्शने करण्यात आली आहेत. काही ठिकाणी हिजाब डेही पाळण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हिजाबच्या विक्रीतही मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. तसेच पश्चिम बंगालमध्येही हिजाबच्या आंदोलनावेळी लाठीमार करण्यात आला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
















