पाचोरा (प्रतिनिधी) पित्याच्या मृत्यूनंतर एकुलत्या मुलीने स्वतःवर कोसळलेलं दु:ख विसरून पित्याच्या पार्थिवाला अग्नीडाग दिल्याची घटना येथे घडली.
घराण्याला कुलदीपक म्हणून तसेच शेवटच्या क्षणी अग्नीडाग देण्यासाठी मुलगाच पाहिजे, असा साधारणपणे समज असतो. परंतू या गोष्टीला फाटा देण्यात आलाय. आपल्या वंशाला दिवा हवा म्हणून ज्याकाळात अनेक ठिकाणी स्त्री भृणहत्येसारख्या घटना समाजात आपल्याच आजूबाजूला घडत होत्या. त्याच काळात मुलगी हीच आपल्या वंशाचा दिवा असे समजून एकाच मुलीवर समाधान मानणारे पाचोरा येथील तालुक्यातील प्रसिद्ध गुळाचे व्यापारी असलेले देवचंद विश्राम पाटील (रा.गिरड ता.भडगाव) यांचे नुकतेच वयाच्या 89 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी पाचोरा येथे पार पडला. यावेळी त्यांच्या स्वतःच्याच मुलीने त्यांना अग्निडाग देऊन समाजाच्या चालत आलेल्या चाली रीती आणि परंपरेला फाटा देत पुरोगामीत्वाचे एक पाऊल पुढं टाकलेलं आहे. देवचंद पाटील यांच्या कन्या पौर्णिमा पाटील (देसले) ह्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांच्या पत्नी असून त्या जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात जिल्हा आरोग्य समन्वयक ह्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या ह्या निर्णयाचे सर्वदूर कौतुक होत आहे.