इस्लामाबाद (वृत्तसंस्था) मुंबईत झालेल्या २६/११ बॉम्ब हल्ल्यांचा मुख्य सुत्रधार असणाऱ्या हाफिज सईदच्या पाकिस्तानमधील लाहोरमधील जौहर टाऊन येथील अकबर चौकातील घराबाहेर २३ जून रोजी मोठा स्फोट झाला. आता पाकिस्तानने या प्रकरणामध्ये भारतावर आरोप केले आहे. या जबरदस्त हल्ल्यामागील संपूर्ण नियोजन आणि वित्तपुरवठा भारताने केला असल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन केला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय वर्गाने या वर्तनाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीही इम्रान खान यांनी यावेळी केली. पाकिस्तानमधील वेगवेगळ्या यंत्रणांच्या सहकार्याने आमच्याकडे हल्ला घडवून आणणाऱ्यांची खोटी नाव, खरी ओळखपत्रं आणि संक्षयित स्थानकांबद्दलची माहिती आहे, असेही यूसुफ म्हणाले. पंतप्रधान इम्रान खान यांनी या पत्रकार परिषदेनंतर ट्विटरवरुन, या बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी आज देशाला यासंदर्भातील तपासाची माहिती देण्याचे निर्देश मीच दिले होते. तसेच देशातील नागरिक आणि लष्कराशीसंबंधित गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने दहशतवादी आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांची माहिती समोर आली, असे इम्रान म्हणाले आहेत.
तर दुसरीकडे या हल्ल्याचा मास्टरमाइंड भारतीय रॉ एजंट असल्याचा दावा पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) मोईद युसुफ यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, २३ जून रोजी झालेल्या या हल्ल्याबरोबरच अनेक सायबर हल्लेही यावेळी करण्यात आले होते. तपासात अडथळा आणि पुरावे नष्ट करण्यासाठी हा हल्ला केला असल्याचे युसुफ यांनी पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या हवाल्याने सांगितले.
२३ जून रोजी लाहोरमधील जौहर टाऊन येथील अकबर चौकातील बोर्ड ऑफ रेव्हेन्यू हाऊसिंग सोसायटीमधील सईदच्या घराबाहेर हा बॉम्बस्फोट झाला होता. एका कारच्या मदतीने हा स्फोट घडवण्यात आलेल्या ज्यात तिघांचा मृत्यू झाला आणि १७ जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. यापूर्वीच भारताने पाकिस्तानमधील बॉम्बस्फोटांमध्ये भारताचा सहभाग असल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानच्या या डावपेचांची माहिती आहे.
लाहोर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या भीषण स्फोटात सुमारे ३० किलो स्फोटके वापरली गेली. यामध्ये परदेशात बनवलेल्या वस्तूंचा वापरही केला गेला असल्याचे ते म्हणाले. या स्फोटामुळे घटनास्थळावर तीन फूट खोल व ८ फूट रुंद खड्ड तयार झाला आहे.