चोपडा (प्रतिनिधी) आषाढीचे महत्व विद्यालयातील विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने पंकज प्राथमिक विद्यालयतर्फे आज ज्ञानोबा माऊलीच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला.
विद्यालयात संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिणी पालखीचे पूजन करण्यात आले. हाती भगवे ध्वज घेतलेले विद्यार्थी,वारकरी वेशभूषेत विद्यार्थी हाती टाळ घेत विठोबा माऊली तुकाराम म्हणत पाऊली नृत्य खेळत होते. योगेश चौधरी यांनी विद्यार्थी वारकरी प्रमुख म्हणून महाराज वेशभूषा परिधान केलेली होती. त्यांच्या हातात टाळ चिपळ्या गजर मुखी विठ्ठल नाम यामुळे शालेय परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. त्यांनी विद्यार्थी वारीचे नेतृत्व केले.
हेमलता बोरोले संस्था संचालक पंकज बोरोले, दिपाली बोरोले मुख्याध्यापक एम.व्ही. पाटील, पालक सर्व शिक्षक वृंद यांनी पाऊली नृत्य खेळत दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला. विद्यार्थीनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थीनी व शिक्षिका यांनी फुगडी सादरीकरण केले. महिला पालक यांनीही वारीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. पंकज नगर, बोरोले नगर, प्रसाद नगर परिसरात विद्यार्थी वारी दुमदुमली. विश्वनाथ महादेव या मंदिर परिसरात वारीचे रिंगण घालुन माऊलीचा गजर मुखी करत नृत्य सादर केले. दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.