पारोळा (प्रतिनिधी) अचानक हृद्यविकाराच्या झटक्याने भाऊचे निधन झाल्यानंतर आपल्या विधवा भावजयसोबत विवाह करणारा तरुण सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील दिर आणि भावजयचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. राहुल विनोद काटे (वय-३१) असं या दिराचं नाव असून त्याने अनिता काटे (वय-२८) या विधवा वहिनीसोबत लग्नाची रेशीमगाठ बांधली आहे. राहुलने घेतलेल्या निर्णयाचं समाजातील सर्व स्थरातून कौतुक होतंय.
लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र ही नाती नियतीने हिरावली तर काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरा, समाजाच्या मानसिकतेला फाटा देत काटे कुटुंबियांनी आपल्या मोठ्या विधवा सूनेचे लग्न आपल्याच लहान मुलाबरोबर म्हणजे दीर राहुल सोबत लावून दिले आहे. गेल्या वर्षी कुटुंबाचा आधारवड असलेला युवा शेतकरी संभाजी काटे याचे हृदयविकाराने निधन झाले. ज्यावेळी संभाजीचे निधन झाले त्याच्या पश्चात विद्या व वैभवी या जुळ्या मुली तर पत्नी अनिता या सात महिन्याच्या गर्भवती होत्या. जन्म होण्यापूर्वीच बाळाच्या पित्याला क्रूर काळाने हिरावून नेले होते.
या कठीण काळात लहान दीर राहुलने परिवाराला धीर दिला. त्यानंतर आठ महिन्यांपूर्वी अनिता यांनी ‘मयंक’ या गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कमी वयात विधवा झालेल्या वहिनीचे आणि भाऊच्या लहान मुलांचं दु:ख राहुलकडून पाहवत नव्हतं. त्यामुळे त्याने वहिनीसोबत लग्नगाठ बांधून तिला व तिच्या मुलांना आयुष्यभरासाठी साथ देण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले. कुटुंबियांनी होकार दर्शविल्यानंतर राहुल व त्याची विधवा वहिनी यांचा विवाह मंगळवारी कोळपिंप्री गावातील भवानी मंदिरात नातेवाईकांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी वऱ्हाडी मंडळींनीही मोठ्या दिलाने या अनोख्या विवाह सोहळ्याचे स्वागत केले आणि नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले.