मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना पक्षातील ४० आमदारांनी बंड केले, फुटले हे एकवेळ ठीक होते; पण शिवसेना पक्ष, चिन्ह काढून घेणे राज्यातील जनतेला पटलेले नाही. मी अमित शाह यांना सल्ला दिला होता की, तुम्ही उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे काही राजकारण करायचे ते करा, पण त्यात बाळासाहेबांना आणू नका. बाळासाहेबांचा पक्ष काढून घेऊ नका, हा माझा सल्ला ऐकला असता तर भाजपचे लोकसभेला एवढे मोठे नुकसान झाले नसते, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.
आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात मनसेच्या नेते, प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांची २०२८ पर्यंत मनसेच्या अध्यक्षपदी निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. यानंतर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे बोलत होते.
ते म्हणाले, मी दिल्लीत अमित शाहांना सांगितले होते की, शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह हे बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. त्याला हात लावू नका, ते उद्धव ठाकरे यांचे नाव नाही तर बाळासाहेबांची ओळख आहे. महाराष्ट्रातील लोकांत बाळासाहेबांबद्दल भावनिक आहेत. भाजपने जी तोडफोड केली, ती लोकांना पटली नाही. त्यामुळे लोक मतदानाला बाहेर पडले नाहीत. दुसरीकडे, मोदी विरोधामुळे महाविकास आघाडीला मतदान झाले. उद्धव ठाकरेंना मराठी लोकांनी फारसे मतदान केले नाही, असे ठाकरे म्हणाले.
विधानसभा निवडणूक आणि महायुतीसंदर्भात बोलताना राज ठाकरे पुढे म्हणाले, आपण कुणाला कशाला २० जागा मागत बसायचे? आपण राज्यात २०० ते २२५ जागा लढण्याची तयारी केली पाहिजे. महायुती असो महाविकास आघाडी त्यांच्या त्यांच्यात जागावाटपावरून आधीच वाद सुरू आहेत. त्यात आपण कशाला कोणाकडे जागा मागायला जायचे? महाराष्ट्रातील लोक मनसेला मतदान करण्यासाठी वाट पाहत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावे, असे सांगत राज ठाकरे यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत.