जालना (वृत्तसंस्था) सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी ८ जूनपासून उपोषणाची हाक दिली आहे. तत्पूर्वी अंतरवाली सराटी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषण अन्यत्र हलविण्याची मागणी केली होती. आताही जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासह मुलांच्या शाळा सुरू होत असल्याने पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारली आहे. दरम्यान, पोलिसांनी खबरदारी म्हणून या गावात बंदोबस्तात वाढ केली आहे.
सगे-सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी आणि कायदा पारित करण्यासाठी जरांगे-पाटील यांनी ४ जूनपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला होता, परंतु निवडणूक निकालाच्या अनुषंगाने आणि आचारसंहितेमुळे त्यांनी उपोषण ४ ऐवजी ८ जूनपासून करण्याची घोषणा केली होती. गोंदी पोलिसांनीही जरांगे-पाटील यांना उपोषण करू नये म्हणून पत्र दिले होते. ८ जून रोजी अंतरवाली सराटी येथे जरांगे- पाटलांनी आमरण उपोषणाची तयारी सुरू केली आहे, मात्र पोलिसांनी पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेसाठी उपोषणाला परवानगी नाकारली आहे. परंतु जरांगे-पाटील हे उपोषणावर ठाम असल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
उपोषण घटनेने दिलेला अधिकार : जरांगे-पाटील !
लोकशाहीमार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला घटनेने दिलेला अधिकार आहे. आपणही सनदशीर मार्गानेच उपोषण करणार आहोत. अगोदर आचारसंहितेमुळे आपण प्रशासनाचा मान राखत उपोषण पुढे ढकलले होते. आता आचारसंहिता रोजी सकाळी १० वाजता कोणत्याही परिस्थिती उपोषण करणार असल्याचे जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. आता आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.