जळगाव (प्रतिनिधी) मका, ज्वारी या पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचा, तर कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनुदानावर किटकनाशके उपलब्ध आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.
सद्य:स्थितीस मका व ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा, तर कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. कपाशीवर अळी पडण्याचा कालावधी हा ठरलेला असतो. तो म्हणजे अमावस्या. सजीव सृष्टीचा मीलन आणि फलन काळ हा आमवस्या असतो. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला एक- दोन दिवस मागे- पुढे म्हणजे महिन्याच्या ज्या चार ते पाच काळ्याकुट्ट रात्री असतात त्या रात्री अळीचे पतंग अंडी घालतात. या पार्श्वभूमीवर अमावस्येच्या दोन दिवस आधी फक्त सिलिकॉन स्टिकर आणि नीम तेल किंवा निंबोळी युक्त अर्काची फवारणी करावी. त्यानंतर चार ते पाच दिवसांनी अंडीनाशक व अळी नाशकांची फवारणी करावी किंवा अळी अति सूक्ष्म अवस्थेत पण कैरीच्या आत जाण्याच्या अगोदरच अळी नाशक फवारा मारुन तिचा बंदोबस्त करावा.
या पिकांवरील किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप), सन २०२१- २२ अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळा मार्फत आपत्कालीन परिस्थितीत कापूस, मका व ज्वारी या पिकांवरील विविध किडींसाठी क्लोरोपायरिफॉस २०% ईसी (रुपये ५२.५०/- प्रति २५० मिली), ॲझाडिरेक्टीन ३००० पीपीएम (रुपये १८२/- प्रति ५०० मिली) या किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येत आहे. ही किटकनाशके महाराष्ट कृषी उद्योग विकास महामंडळाच्या अधिकृत वितरकांतर्फे करण्यात येणार आहे. या किटकनाशकांचा पुरवठा ५० टक्के अनुदानावर करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषर अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
उपरोक्त किटकनाशके अनुदानावर प्राप्त करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित पिकांसाठी स्वयंघोषणापत्र सादर करुन तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परमीट प्राप्त करुन घ्यावयाचे आहे. त्यानंतर हा परवाना महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या अधिकृत वितरकाकडे देवून 50 टक्के अनुदानावर किटकनाशकांची उचल करावयाची आहे.
वितरकांची नावे अशी (अनुक्रमे वितरकाचे नाव व कीटकनाशकांची उपलब्धता लिटरमध्ये) : लक्ष्मी ॲग्रो एजन्सीज, जळगाव – १००. जंगले अँड सन्स, भुसावळ, ५०, खंडेलवाल के. एस. के., बोदवड -६०. खानदेश ट्रेडर्स, यावल – ६०. महेश कृषी केंद्र, रावेर, ५०. सागर सीडस, मुक्ताईनगर, ६०. किरण ॲग्रो एजन्सी, अमळनेर, १४०. माऊली ट्रेडर्स, चोपडा, १००. शहा कृषी केंद्र, एरंडोल, ७५. व्यंकटेश ॲग्रो एजन्सी, धरणगाव, ८५, संदेश कृषी केंद्र, पारोळा, १३५. विष्णू कृषी केंद्र, चाळीसगाव, १७०-१००. शेतकरी सहकारी संघ, जामनेर, २२५-१००, आदर्श के. एस. के., पाचोरा, 1१२०, ६०. भडगाव फ्रुट सेल सोसायटी, ७० उपलब्ध आहेत.