नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देश कोरोनाविरोधात लढाई लढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं आणि आपण पीएम केअरला २ लाख ५१ हजार रुपये मदत केली. पण स्वत: च्या आईला कोरोना झाला असताना मात्र तिला कुठेही बेड मिळाला नाही, शेवटी तिचा जीव गेला अशी खंत गुजरातमधील विजय पारिख यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, त्यांनी ट्वीट करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न केला आहे. “पुढच्यावेळी किती दान द्यावे लागेल की, अशी परिस्थिती येणार नाही.”
पीएम केअर फंडामध्ये दिलेल्या देणगीचा स्क्रीनशॉट शेअर करत पारीख यांनी ट्विट केले की, २ लाख ५१ हजार रुपयांची देणगी दिल्यानंतरही मला माझ्या आईला रुग्णालयात बेड मिळू शकला नाही. कृपया मला सांगा की, मला कोरोनाच्या तिसर्या लाटेत बेड आरक्षित करण्यासाठी आणखी किती दान करावे लागेल. जेणेकरुन मला माझ्या कुटुंबातील एखादा सदस्याला वाचवता येईल. विजय पारीख यांनी ट्विट केल्यानंतर त्यांचे ट्विट सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे.
विजय पारीख हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत आणि त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ २०१० पासून अनेक ट्विट केले आहेत. ट्विटर वापरकर्त्यांनी त्यांच्या ट्विटचा हवाला देत भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. परीख यांनी ट्विटमध्ये पीएमओ, राजनाथ सिंह, आरएसएस आणि स्मृती इराणी यांना टॅग केले आहे. आपल्यासारखे या देशात अनेक असल्याचं सांगत विजय पारिख यांनी सांगितलंय की, पैसा हा मुद्दाच नाही, जर पैशाने इतर रुग्णांना सुविधा मिळत असतील तर मी माझी सर्व संपत्ती दान करायला तयार आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी, बेड्सच्या अभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पीएम केअरला लाखो रुपये देऊनही अनेकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना वाचवता आलं नाही.