धरणगाव (प्रतिनिधी) अवघ्या एका दिवसापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये मोठी टशन बघायला मिळाली. परंतू दुसऱ्याच दिवशी तापलेल्या राजकीय वातावरणात प्रेमाच्या सरी बरसल्याचे चित्र धरणगावकरांना बघायला मिळाले. निमित्त होते शिंदे गटाचे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख भैय्याभाऊ महाजन यांच्या वाढदिवसाचे !. भैय्याभाऊ महाजन यांना ठाकरे गटाचे युवा सेनेचेच युवाउप जिल्हाप्रमुख योगेश वाघ यांनी शहरात शुभेच्छा फलक लावून जाहीर शुभेच्छा दिल्यामुळे गावाच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झालीय.
राजकारणापलीकडची मैत्री जपण्यात या देशात महाराष्ट्रच क्रमांक एकवर आहे. सुसंस्कृत आणि सभ्य राजकारण ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळेच तर राज्याच्या राजकारणासह जिल्हा, तालुका पातळीवर देखील वेगवेगळ्या पक्षात राहून देखील अनेक राजकीय नेते मैत्री जपून असल्याचे आपण बघतो. जळगाव जिल्ह्यासह धरणगाव शहरात राज्यातील सत्तांतरापासून शिंदे गट आणि ठाकरे गटात राजकीय संघर्ष सुरु आहे. आंदोलन, एकमेकावर आरोप अगदी समोरासमोर भिडण्याचे देखील प्रसंग आलेत. परंतू अशा राजकीय संघर्षाच्या काळात देखील मैत्री जपली गेली पाहिजे. गावाला समाजाला सकारात्मक संदेश गेला पाहिजे, असचं काहीसं धरणगावात घडलं आहे.
शिंदे गटाचे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख भैय्याभाऊ महाजन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडियासह गावात मोठ्या प्रमाणात शुभेच्छा फलक झळकले आहेत. रात्री ठाकरे गटाचे युवा सेनेचेच युवाउप जिल्हाप्रमुख योगेश वाघ यांनी देखील भैय्याभाऊ महाजन यांना सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्यात. पण सकाळी गावात जेव्हा योगेश वाघ यांनी लावलेले शुभेच्छा फलक धरणगावकरांनी बघितले तेव्हा मात्र, चर्चेला उधाण आले.
प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तर्क लावत होता. परंतू राजकारणात फक्त निवडणुकीपुरते मतभेद पाहिजे इतर वेळी मात्र, एकमेकाच्या सुख-दु:खात सहभागी झाले पाहिजे, अशाच सुज्ञ नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या. दरम्यान, भैय्याभाऊ माझा चांगला मित्र आहे. राजकारण आणि मैत्री ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अशी प्रतिक्रिया योगेश वाघ यांनी दिलीय तर योगेशभाऊच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करत असल्याचे भैय्याभाऊ महाजन यांनी म्हटले आहे.
















