नंदुरबार (प्रतिनिधी) वीज बिलाची थकबाकी भरत नाही म्हणून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट नंदुरबार तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला. तर त्यामुळे संतप्त तहसीलदार यांनी महसुलाची थकबाकी भरत नाही म्हणून वीजवितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. महसूल आणि महावितरण यांच्यातील हा वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचला असून, संबंधित वरिष्ठ अधिकारी दोन्ही विभागाचा समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान संबंधित वरिष्ठ अधिकारी दोन्ही विभागाचा समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती दिली आहे. MSEDCL कंपनीने सर्वत्र थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम चालवली आहे. थकबाकीदारांवर गुन्हे देखील दाखल केले जात आहेत. वरिष्ठांच्या आदेशामुळे कठोरपणे अंमलबजावणी करणाऱ्या महावितरणच्या कार्यकारी उपअभियंता मनीषा कोठारी यांनी नंदुरबार तहसील कार्यालयाला वीज बिलाची थकीत रक्कम त्वरित भरण्याचे सांगितले होते. परंतु ट्रेझरी मधून बिलाची रक्कम हस्तांतरित होण्याला अवकाश असल्यामुळे वीज बिल भरले गेले नाही. तोपर्यंत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी थेट नंदुरबार तहसील कार्यालयात जाऊन मुख्य वीज पुरवठाच खंडित केला. त्यामुळे तहसील कार्यालयातील काम ठप्प झाले आणि यामुळे महावितरण आणि महसूल दोन खात्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. मग तहसील कार्यालयाने देखील महावितरण कंपनीच्या सब स्टेशन आणि कार्यालयांकडे थकीत असलेल्या महसूलचा भरणा का केला नाही अशी विचारणा करीत थेट नंदुरबार शहरातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला सील ठोकले.
या कारवाईमुळे वीज वितरणच्या या कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान संतप्त कार्यकारी अभियंता पाटील अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी आणि कर्मचारी यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिस ठाणे गाठले. तसेच तहसीलदार भाऊसाहेब थोरातांनी महावितरणच्या सर्व कार्यालयांची थकबाकी वसूल करण्यासाठी धडक मोहीम राबवण्याचा इशारा देत गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे.