धरणगाव (प्रतिनिधी) ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या ‘माय’ व ‘वस्ती आणि मोहल्ला’ या दोन कवितांचा अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
या कविता ‘माझ्या घराचे दार’ या कवितासंग्रह व कवितारती या नियतकालिकातून घेण्यात आल्या आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बी.ए. प्रथम वर्ष अभ्यासक्रमात डॉ. सोनवणे यांच्या ‘गाव कुठे आहे?’ या कथेचा या वर्षापासून समावेश करण्यात आला आहे. ऐंशीच्या दशकापासून डॉ. सोनवणे लेखन करत असून त्यांची ५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या शब्दकोश समितीच्या संपादक मंडळावर तथा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. अहिराणी व बहिणाबाई साहित्य संमेलनांचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे.