जळगाव (प्रतिनिधी) वनविभागाच्या अन्यायाविरोधात आज लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात उपटलेली पिके घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली.
वनक्षेत्रात पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनींवरती त्यांचे दावे नियमित करण्यासाठी संसदेने १६ सप्टेंबर २००६ रोजी आदिवासी व वननिवासी यांच्यावर शतकानुशतके अन्याय झाला आहे. तो दूर करण्यासाठी वनहक्क कायदा पारित केला. या कायद्याअंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा गावातील १४ शेतकऱ्यांनी आपले दावे दाखल केले आहेत. मात्र, वनविभागाने वनपरिक्षेत्र वदोडा यांचे कार्यालय कुऱ्हा काकोडा येथील वनकर्मचारी यांनी या शेतकऱ्यांना दादागिरी व धमक्या देत त्यांच्या शेतात बेकायदेशीर घुसत शेतात तिसऱ्यांदा पेरलेले उभे पीक उपटून नष्ट केले. व त्यांच्यावर उलट ३५३ कलमाखाली केसेस दाखल केल्यात.
वनविभागाच्या या अन्यायाच्या विरोधात आज लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात उपटलेली पिके घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. यावेळी प्रतिभाताई यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर या शेतकऱ्यांची बाजू मांडत या वनकर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची व ज्या दावेदारांचे दावे अद्याप प्रलंबित आहेत. त्यांच्या शेतात वनविभागाने कुठलीही आगळीक करू नये, अन्यथा आम्हाला कोरोना काळातही तीव्र आंदोलन करावे लागेल, असा त्यांनी इशारा दिला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वनविभागावर नाराजी व्यक्त करत उपविभागीय वनहक्क तपासणी समितीमार्फत सदर शेतात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याबाबत व संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी प्रतिभाताई यांनी वनविभागाने वनदावेदारांना जर विनाकारण त्रास देणे थांबवले नाही तर आम्हाला पुन्हा कोरोनाचा विचार न करता मुंबई गाठत मुख्यमंत्री यांच्या समोर निदर्शने करावी लागतील, असे सांगितले.