पिंपरी (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक तथा आरएसएसच्या दबावात येऊन राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे केला आहे.
आता मोदींनी स्वतःच्या नावे उभारलेल्या स्टेडियमचे आणि केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांचे नाव दिलेल्या स्टेडियमचेही नामांतर करून औदार्य दाखवावे, अशी खोचक मागणी त्यांनी केली आहे. क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद यांचे योगदान वंदनीय आहे, यात वाद नाही, हे स्पष्ट करताना खेळाडूंविषयी खरोखर आदर व्यक्त करायचा होता, तर भाजप व आरएसएसने आणखी दुसरा क्रीडा पुरस्कार जाहीर करायला हवा होता, असे साठे म्हणाले. परंतू नेहरू, गांधी घराण्याच्या नावाबदलच्या तिरस्कारातून त्यांनी हा नामबदल केल्याचे त्यांनी सांगितले. परंतू, राजीव गांधी यांचे नाव देशातील जनतेच्या मनामनात कोरलेले असल्याने पुरस्कारावरील हे नाव बदलून त्यांचे बलिदान देशातील जनता विसरणार नाही. पण, एखाद्या नावाविषयी किती पराकोटीचा द्वेष असू शकतो हे, मात्र मोदी यांच्या कृतीतून देशवासीयांना कळले, असा टोलाही त्यांनी मोदी व भाजपला लगावला.