नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी ट्विटर अकाऊंटवरून लस घेतानाची छायाचित्रे शेअर केली. मी एम्स रुग्णालयात जाऊन कोव्हिड लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या मोजक्या मार्गांपैकी लस हा एक मार्ग आहे. तुम्ही लसीकरणासाठी पात्र असाल तर तात्काळ लस घेऊन टाका, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीची पहिला डोस १ मार्चला घेतला होता. त्यांनी स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस टोचून घेतली होती. दरम्यान, देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीच्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीचे दोन डोस घेतले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात कोव्हॅक्सीनच्या सुरक्षिततेविषयी अनेकांना साशंकता होती. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सीन ही देशी लस घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कोव्हॅक्सीन टोचून घेतल्याने या लसीविषयीची शंका बऱ्याच प्रमाणात दूर झाली आहे. परिणामी लसीकरण मोहिमेचा वेगही वाढण्याचा अंदाज आहे.
शरद पवारांनीही घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस नुकताच घेतला होता. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांना हा डोस देण्यात आला होता. लसीचा पहिला डोस शरद पवार यांनी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात जाऊन घेतला होता.