मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेसमधील विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव नक्की झाल्याचं खात्रीलायक वृत्त समोर आलं आहे.
उद्या सोमवार, दि. २७ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार असून बुधवार, दि. २८ डिसेंबर रोजी अध्यक्षांची निवड होणार आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आलेलं असून हे पद कोणाच्या वाट्याला येईल याविषयी अनेक तर्क लढवले जात होते.
काँग्रेस पक्षातून एकाचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, यासह भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा केली जात होती. मात्र, यात पृथ्वीराज चव्हाण यांची या पदासाठी निवड झाल्याचं वृत्त आहे.
कोण आहेत पृथ्वीराज चव्हाण?
पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदोरचा. कऱ्हाडच्या नगरपालिकेच्या शाळेत त्यांचं सातवीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कराडच्या ज्या टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्याच शाळेत इयत्ता आठवीला प्रवेश घेतला. त्यानंतर पुढील शिक्षण दिल्लीत झालं. त्यांनी राजस्थानच्या बीआयटीस पिलानीमधून बीई-ऑनर्सची पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एमएसची पदवी घेतली. त्यानंतर एअरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरीही केली. पृथ्वीराज चव्हाण यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला होता. त्याचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे समर्थक होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचं बाळकडू घरातून मिळालं. त्यांचे वडील इंदोरच्या होळकर संस्थानमध्ये कायदा सल्लागार होते. ते जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातही होते.
















