जळगाव (प्रतिनिधी) वरणगाव येथील भांडण सोडविण्यास गेलेल्या हॉटेल मालकाला करण्यात आलेल्या मारहाणीचा जळगाव डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंडं आसोसिएशनतर्फे निषेध करण्यात आला. शनिवारी दुपारपर्यंत शहरातील सर्व हॉटेल, वाईन शॉप बंद ठेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन देण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही काळापासून शासनमान्य अनुज्ञाप्तीधारक हे व्यवसायीक दृष्टीकोनातून भयंकर अडचणीत आले आहेत. अवैध दारू विक्री, बनावट कारखाने ह्याने तर जिल्हा राज्य त्रस्त आहेतच परंतु आता ह्या पलीकडे जाऊन अनुज्ञाप्तीधारकांना त्यांचा अनुज्ञाप्ती जागेवर किंवा बाहेर शिवीगाळ मारहाण केली जात आहे, स्थानिक भागात पोलीस तक्रार केल्यास ही अशा गुन्हेगार व आरोपींना शिक्षा न होता यांना ताबडतोब जामीन मिळून हे पुन्हा दुसऱ्या तिसऱ्याकडे गदारोळ करतात. ह्याने आता जिल्ह्यात राज्यातशासनमान्य अनुज्ञाप्तीधारक यांचा मनात दहशतीचे वातावरण निर्माण होत चालले आहे, व अशा गुन्हेगारांची हिम्मत वाढत चालली आहे. तरी अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कडक नियम व कायदे लागू करावे व अवैध विक्री बनावट मद्य विक्री बनवणारे व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. असे यात म्हटले आहे.
दरम्यान वरणगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या संपाला १००टक्के प्रतिसाद मिळाला आहे. या संपामुळे शासनाच्या महसुलाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे तर अधिकृत परवानाधारकांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी जळगाव डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष ॲड. रोहन बाहेती, शहर तालुका अध्यक्ष सतीश नारखेडे, सचिव पंकज जंगले, ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र चौधरी, जामनेरचे शंकर मराठे, चाळीसगावचे उदय पवार, भडगाव-पारोळाचे सुरेश मराठे आदीं पदाधिकारी संपात सहभागी झाले होते.