पुणे (वृत्तसंस्था) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पुण्यात शाब्दिक फटकेबाजी केली. पुणेकरांच्या स्वभावाचं वर्णन करताना त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही, असं म्हणत त्यांनी पुण्यातील सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा ते भिकारदास मारुती, अशा देवांची नावे अजित पवार यांनी सांगितली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात संजीवन उद्यानाचा भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. अजित पवार म्हणाले, “नावं ठेवण्यात पुणेकरांचा हात कुणीही धरु शकणार नाही. आता जिथे हा कार्यक्रम होतोय तिथे जुन्या काळी विचित्र अपघात, खून मारामाऱ्या होत असायचे. तसंच या भागात रान डुकरांचा जास्त वावर होता. याभागाला ‘डुक्कर खिंड’ असं म्हटलं जातं. तसंच पुण्यातील अनेक ठिकाणांना अशाच प्रकारची नावं आहेत. पुणेरी पाट्यांचं कुतूहल सगळीकडे आहे. खरोखरंच पुणेकरांचा हात कुणी धरू शकत नाही. नावं ठेवण्यात तर नाहीच नाही… अहो, पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही”, अशी टोलेबाजी अजित पवार यांनी केली.
“पुणेरी पाट्याचं कुतूहल सगळ्यांना आहे. त्यापाठीमागे पुणेकरांची असलेली कल्पना, निश्चित पुणेकरांचा हात कुणी धरु शकणार नाही, हे मी आपल्या सगळ्यांना गॅरंटीने सांगतो, तुम्ही म्हणाल कसं काय.. तर आपण अनेक शहरांत जातो, पण आपल्या इथे पुण्यात काय म्हणतात, पासोड्या मारुती, सोट्या म्हसोबा… नुसता म्हसोबा नाही-सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर… उपाशी विठोबा, ताडीवाला दत्त, डुल्या मारुती, जिलब्या मारुती, भिकारदास मारुती….. पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही. जिथे देवांना सोडलं नाही तिथे माणसांची, ठिकाणांची काय कथा”, असं म्हणत अजित पवारांनी उपस्थितांमध्ये खसखस पिकवली.