नांदेड (वृत्तसंस्था) दिवाळीत खरेदीसाठी साखर कारखाना मंगरुळ येथे उसाच्या बिलाचा धनादेश आणण्यासाठी जाताना रस्त्यात उभ्या ट्रकवर एक दुचाकी आदळली. यामुळे ऐन दिवाळीत काका, पुतण्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. १३ नोव्हेंबर रोजी घडली.
अपघातानंतर गावावर पसरली शोककळा !
मनुला ( बु.) ता. हदगाव येथील दीपक ग्यानबाराव जाधव (३८) हा काका दगडूजी संभाजी जाधव (७५) यांना घेऊन सोमवार दि. १३ नोव्हेंबर रोजी दुचाकीने विदर्भातील मंगरुळ साखर कारखाना येथे ऊसाच्या बिलाचा धनादेश आणण्यासाठी जात होते. आर्णी ( जि. यवतमाळ) जवळ रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी धडकली. त्यामुळे पुतण्या दीपक जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर काका दगडूजी संभाजी जाधव यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान १७ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. त्यामुळे गावावर शोककळा पसरली.
दिवाळीत खरेदीसाठी धनादेश आणण्यासाठी जाताना अपघात !
दिवाळी सणाला नवीन कपडे व इतर सामान खरेदीसाठी ऊसाचे पैसे कामी येतील म्हणून काका- पुतणे धनादेश आणण्यासाठी जात होते. मनुला परिसरात ३ साखर कारखाने असतांना उसाची तोड लवकर होत नसल्याने व ऊस तोड झाल्यावर हरभरा पिक घ्यायचे होते त्यामुळे मंगरुळचा कारखाना लवकर उस तोडणी करीत असल्याने त्यांनी मंगरुळला उस दिला होता. शुक्रवार दि.१७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दगडूजी जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. स्व. दीपक जाधव यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुली, मुलगा असा परिवार आहे.