नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनापासून बचावासाठी अनेकजण लसीकरण केंद्रावर गर्दी करताना दिसत आहेत. अशीच गर्दी मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यात झाली. मात्र यावेळी लसीकरणासाठी आलेल्या महिलाच आपसात भिडल्या आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी सुरू झाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
खरगोनच्या कसरावद येथील खलबुजुर्ग गावातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात दिसत की, लसीकरण केंद्रावर महिलांची मोठी रांग लागलेली आहे. यादरम्यान आधी लस कोण घेणार यावरुन अनेक महिलांमध्ये वाद सुरू झाले. आधी किरकोळ वाद आणि नंतर त्याचं थेट हाणामारीत रुपांतर झाल्याचं यात पाहायला मिळतं. प्रकरण इतकं पुढे गेलं की लस घेण्यासाठी रांगेत थांबलेल्या महिला एकमेकींचे केस ओढू लागल्या. इतकंच नाही तर काही महिलांमध्ये तर धक्काबुक्कीही सुरू झाली. यावेळी काही पुरुष महिलांचं हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र ते अपयशी ठरतात. तर, काही लोकांचं असं म्हणणं आहे, की सेंटरवर योग्य व्यवस्था नसल्यामुळे हे भांडण झालं आहे. ज्याला जिथून जागा मिळाली तिथून तो सेंटरमध्ये घुसला, यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या कामातही अडथळा आला.